पुजाऱ्याचे मत परिवर्तन
एका गावात एक पुजारी राहत होता. तो रोज देवाची पूजा करत असे. एकदा तो पुजारी अंधविश्वासापोटी देवाला प्रसन्न करण्यासाठी एका बकऱ्याचा बळी देण्याचे ठरवितो. जेव्हा बकऱ्याला समजते कि, आपल्याला बळी देण्यात येणार आहे. तेव्हा एकाचवेळी बकरा अचानक हसायला तर कधी रडायला सुरुवात करतो. बकऱ्याला असे वागणे पाहून पुजारी संभ्रमात पडतो आणि तो बकऱ्याला विचारतो कि, तू असे का करत आहेस ? तेव्हा बकरा म्हणतो,' मागील एका जन्मी मी देखील पुजारी होतो आणि मीपण असाच हव्यासापोटी एका बकऱ्याचा बळी दिला होता. ते पाप केल्यामुळे मला कित्येक जन्म बकऱ्याचे रूप घेऊन पाप फेडावे लागले. आज मी पापातून मुक्त होणार आहेः त्यामुळे मी हसत आहे. आता, तू देखील मी जे केले आहे ते करणार आहेस. तुलादेखील माझ्याप्रमाणे खूप सारे जन्म असेच दुःख भोगावे लागेल. त्यामुळे दयेपोटी माझे हसणे अश्रूमध्ये रुपांतरीत झाले. पुजाऱ्याला त्याची चूक उमगते. तो बकऱ्याला मुक्त करतो. तो ठरवतो कि देवाला ध्यानधारणा करूनच प्रसन्न करून घ्यायचे. तात्पर्य - प्राण्यांचा बळी दिल्याने देव प्रसन्न होत नाही .
