विनाशकाले विपरीत बुद्धि

विनाशकाले विपरीत बुद्धि

bookmark

उंटाला दुर्बुद्धी एका जंगलात वनराज सिंह राहात होता. त्या सिंहाचे तीन मंत्री होते, ते म्हणजे कावळा, कोल्हा आणि वाघ होय. एकदा वनराज सिंह, आपल्या या तीन मंत्र्यांसह शिकारीला निघाले तेव्हा वाटेत जात असताना त्यांना एक अतिशय घाबरलेले उंटाचे पिल्लू दिसले. आपल्याला पाहून घाबरलेल्या त्या पिल्लाची सिंहाला दया आली म्हणून सिंहाने त्याला न मारता अभय दिले आणि आपल्या परिवारात सामील करून घेतले. ते उंटाचे पिल्लू आता सिंहाच्या कृपाछत्राखाली राहू लागले आणि जंगलातील गवतपाला खाऊन धष्टपृष्ट झाले- एके दिवशी सिंहाची प्रकृती बिघडली म्हणून त्याने आपल्यासाठी शिकार करून आणण्याची जबाबदारी त्याच्या तीन मंत्र्यांवर सोपवली. ते तीन मंत्री शिकार करून आणण्यासाठी गुहेबाहेर पडले आणि एका अचानक आभाळात एकाएकी पाऊस भरून आला. ते बघून कोल्हा आपल्या इतर दोन सहकाऱ्यांना म्हणाला, "मित्रांनो आपल्याला इतकी भूक लागली आहे की त्यामुळे काही सुचेनासे झाले आहे आणि जर त्यात हा पाऊस सुरू झाला तर मग काही खरे नाही. मग आपण शिकार कशी करणार आणि सिंहमहाराजांना काय नेऊन देणार? त्यापेक्षा माझ्या डोक्यात एक कल्पना आली आहे ती अशी की आपण सिंहमहाराजांकडून त्या उंटाला मारण्याची परवानगी घेऊ या." कोल्हयाचे हे बोलणे वाघाला अजिबात पटले नाही. तो कोल्हयाला म्हणाला, "नाही ते शक्य नाही, कारण सिंहमहाराजांनी त्या उंटाला अभय दिले आहे त्यामुळे ते त्याची शिकार करण्याची परवानगी आपल्याला कधीही देणार नाही." वाघाचे ते बोलणे ऐकून कावळा म्हणाला, "हे बघा वाघोबा, मी जरा स्पष्ट बोलतो आहे तेव्हा राग मानू नका, परंतु तुमच्या बोलण्याला काही अर्थच नाही, कारण जर भुकेने जीव जायची वेळ आली तर नीतीने वागणारे देखील आपले जीवन वाचविण्यासाठी कोणतीही वाईट गोष्ट करायला तयार होतात." कावळयाचे बोलणे ऐकून कोल्हयाने त्याला पाठिंबा दिला व तो म्हणाला, "आपण असे करू की, जर सिंहमहाराज उंटाला दिलेले वचन मोडण्यास तयार झाले नाही तर त्या उंटालाच आपण त्यांच्यासाठी प्राण देण्यासाठी तयार करू आणि असे झाले तर सिंहमहाराज त्याला मारण्याची आपल्याला परवानगी देतील ना?" कोल्हयाचे ते बोलणे ऐकून मात्र वाघाला आश्चर्य वाटले व त्याने विचारले, "अहो कोल्होबा, सिंहमहाराजांची भूक भागविण्यासाठी तो उंट कसा काय मरण्यास तयार होईल?" तेव्हा कोल्हयाने हसत हसत कावळा आणि वाघ या दोघांच्याही कानात गुपचुप काहीतरी सांगितले आणि मग ते तिघेही सिंहमहाराजांकडे गेले. सिंहाने आपल्या तिन्ही मंत्र्यांना शिकारीशिवाय आल्याचे बघितले व तो निराश होऊन म्हणाला, " हे काय, तुम्ही तर शिकार न घेताच आले आहात आणि माझा तर भुकेने अतिशय जीव चालला आहे, आता मी आजचा दिवस कसा काढणार?" कोल्हा सिंहाला म्हणाला, "महाराज आता आपल्याकडे एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे, वाघोबा त्या उंटाला मारतील आणि तुमच्या दोन-तीन दिवसांच्या भोजनाची व्यवस्था करतील." सिंह लगेचच म्हणाला, "नाही, नाही ते शक्य नाही, कारण मी त्या उंटाला अभय दिले आहे आणि त्याला धोका देण्याचे पाप मी करणे कसे शक्य आहे?" कोल्हा सिंहाला म्हणाला, "परंतु महाराज, सर्व वन्य प्राण्यांचे स्वामी असलेले आपण आणि आपले बहुमूल्य प्राण वाचविण्यासाठी जर उंट स्वतःहूनच तयार झाला तर?" कोल्हयाचा हा प्रश्न ऐकून, भुकेने कासावीस झालेला सिंह त्याला म्हणाला, "हा, मग ती गोष्ट वेगळी आहे. तो माझा आश्रित आहे व त्यामुळे त्याच्या इच्छेला मान देणे हे माझे कर्तव्यच आहे. पण तो माझ्यासाठी मरण्यास तयार होईल का?" तेव्हा कोल्हयाने आपली आखलेली योजना सिंहाला सांगितली आणि भुकेल्या झालेल्या सिंहाने ती मान्य केली. तेवढयात दूरवर असलेली झाडे-झुडुपे खाऊन समाधानी झालेला उंट सिंहाच्या प्रकृतीविषयी चौकशी करण्यास गुहेत आला आणि वनराजाला नमस्कार करून आपले मस्तक नमवून तो त्याच्या प्रकृतीविषयी विचारू लागला. कोल्याने सांगितल्याप्रमाणे सिंह त्याला म्हणाला, "हे उंटा, माझी प्रकृती तशी आज ठीक आहे. परंतु मला अतिशय भूक लागली असल्याने अशक्तपणा जाणवतो आहे, काय करावे ते कळत नाही." सिंहाचे ते बोलणे ऐकून ठरविल्याप्रमाणे कावळा त्याला म्हणाला, "महाराज, आम्ही तिघे मंत्री तुमच्यासाठी शिकार आणावयास गेलो होतो परंतु आम्हाला ती न मिळाल्यामुळे आम्ही तसेच परत आलो परंतु म्हणून काय तुम्ही उपाशीच रहायचे? हे बघा, तुम्ही आहात म्हणून प्रजा आहे तेव्हा आता तुम्ही वाघोबांना मला मारायला सांगा आणि मग माझे मांस खाऊन आपली भूक तुम्ही भागवा." सिंह लगेच म्हणाला, "छे ते शक्य नाही. मी भुकेने मेलो तरी मला त्याची पर्वा नाही परंतु मी माझी भूक भागविण्यासाठी तुमचा बळी घेणार नाही." त्यानंतर वाघ पुढे आला व सिंहाला म्हणाला, "महाराज, असा अविचार करू नका. आपण काहीही करून जिवंत राहणे महत्वाचे आहे, त्यामुळे आपण मला ठार मारा व माझे मांस खा आणि आपली भूक भागवा. तुम्हाला त्यामुळे बरे वाटेल आणि माझ्या आयुष्याचे देखील सोने होईल." परंतु सिंहाने पूर्वीच्या दोघांच्या विनंतीप्रमाणेच वाघाला देखील नकार दिला. ते बघून त्या उंटाला वाटले की, जशी त्या तीन मंत्र्यांची विनंती सिंहमहाराजांनी मान्य केली नाही, तशीच ते आपण केलेली विनंती देखील मान्य करणार नाहीत, म्हणून तो उंट फक्त एक रित म्हणून सिंहाला म्हणाला, "महाराज, मी देखील आपल्यासाठी आनंदाने माझे प्राण देण्यास तयार आहे." उंटाचे ते शब्द ऐकून सिंहाने खूण करताच वाघाने लगेचच त्याच्यावर झडप घेतली. तेव्हा तो उंट मरताना स्वतःशीच म्हणाला, "अरेरे! खरोखरच म्हणतात ना! 'विनाशकाले विपरीत बुद्धिः तसेच माझे झाले आहे. मला फक्त चांगले खायला प्यायला मिळेल म्हणून वाळवंट सोडून या वनात आलो, आणि म्हणूनच मी कपट असलेल्या चौकडीच्या कारस्थानाला नाहक बळी पडलो." याकरीता आपल्याकडे जे आहे त्यातच समाधानी असावे नाहीतर नाहक संकटांना बळी पडावे लागते.