येशूचे रुपांतर
एके दिवशी, येशूने आपल्या शिष्यांपैकी पेत्र, याकोब व योहान हया तिघांना आपल्या बरोबर घेतले. (य़ोहान नावाचा शिष्य व ज्याने येशूचा बाप्तिस्मा केला ते दोघे एकच व्यक्ती नाहीत.) ते प्रार्थना करण्यासाठी एक उंच डोंगरावर गेले. य़ेशू प्रार्थना करीत असतांना त्याचा चेहरा सूर्यासारखा तेजस्वी झाला आणि त्याची वस्त्रे प्रकाशासारखी पांढरीशुभ्र झाली, इतकी पांढरीशुभ्र की, पृथ्वीवरील कोणालाही तेवढी पांढरीशुभ्र काढता आली नसती.
तेंव्हा मोशे व एलीया संदेष्टा हे त्यांच्या दृष्टीस पडले. ही माणसे शेकडो वर्षांपूर्वी ह्या पृथ्वीवर होऊन गेली होती. ते येशूच्या मृत्युविषयी त्याच्याशी बोलत होते, जे यरुशलेममध्ये घडणार ङोते.
जेंव्हा मोशे व एलीया येशूबरोबर बोलत होते, पेत्र येशूला म्हणाला, “इथे असणे आम्हाला बरे आहे. येथे आपण तीन मंडप बनवू, एक आपणासाठी, एक मोशेसाठी, व एक एलीयासाठी.” पेत्र काय बोलत होता त्याचे त्याला समजत नव्हते.
पेत्र बोलत असतानाच, एका तेजस्वी मेघाने येऊन त्यांना वेढिले व मेघातून अशी वाणी झाली की, ‘‘हा माझा पुत्र आहे याच्यावर मी प्रीती करतो. मी याजविषयी संतुष्ट आहे. त्याचे तुम्ही ऐका’’ ते तिन्ही शिष्य खूप भयभित झाले व भूमिवर खाली पडले.
तेंव्हा येशूने त्यांना स्पर्श करुन म्हटले, ‘‘भिऊ नका. चला उठा.’’ जेंव्हा त्यांनी सभोवताली पाहिले, तेंव्हा तेथे फक्त येशू होता.
येशू आणि ते तीन शिष्य पुन्हा डोंगरावरुन खाली उतरले. तेंव्हा येशू त्यांना म्हणाला की, इथे जे घडले त्याविषयी कोणाला काही सांगू नका. मी लवकरच मरेल व पुन्हा जिवंत होईल. त्यानंतर तुम्ही याविषयी लोकांना सांगू शकता.’’
बायबल कथा: मत्तय //17:19; मार्क 9 : 2 - 8; लूक 9 : 28 - 36//
