आधी बुद्धी जाते, मग लक्ष्मी जाते

आधी बुद्धी जाते, मग लक्ष्मी जाते

bookmark

तरूणाचे नसते शहाणपण एका गावात एक तगडा असा इसम रहात होता. त्याचा आपल्या स्वतःच्या जिभेवर अजिबात ताबा नव्हता. एके दिवशी तो इसम आपल्या गावाहून दुसऱ्या गावी पायी पायी जात होता तेव्हा त्याला वाटेत एका वाटमाऱ्याने अडविले. त्याने त्या वाटमाऱ्याशी बराच वेळ झुंज दिली. अखेरीस तो खूप दमला, ते पाहून त्या वाटमाऱ्याने त्याच्यावर अजून जोरदार हल्ला चढविला आणि त्याला बेदम मारले. त्यामुळे अगदी नाईलाजाने तो इसम गुपचुप शांत उभा राहिला. तो शांत झालेला पाहून त्या लुटारूने त्या इसमाच्या शर्ट व पँटचे सर्व खिसे तपासून पाहिले परंतु त्यात त्याला काहीही मिळाले नाही. तेव्हा तो अतिशय चिडून त्या इसमाला म्हणाला, "अरे, जर तुझ्याकडे औषधाला देखील पैसे नव्हते तर मग तुला माझ्याशी एवढी मारामारी करण्याची काय गरज काय होती? अरे दीडशहाण्या, तू दरिद्री तर आहेसच, पण त्याशिवाय तू मूर्ख देखील आहेस." तो लुटारू त्या इसमाला असे बोलून तेथून जायला निघाला असता तो इसम रागाच्या भरात त्याला म्हणाला, "ए महामुर्खा! तू कोणाला दरिद्री व मूर्ख म्हणतोस ? मला? अरे, मी जर दरिद्री असतो, तर या वेळेला माझ्याकडे रोख दहा हजार रूपये असते का? आणि मी जर मुर्ख असतो तर तुझ्यासारख्या दरिद्री वाटमाऱ्याकडून माझे ते पैसे लुटले जाऊ नयेत म्हणून माझे डोके वापरून ते पैसे माझ्या दोन्ही पायांतील बुटांच्या तळांशी लपवून ठेवले असते का? मी शहाणा आहे म्हणूनच ही युक्ती करू शकलो ना?" त्या इसमाच्या तोंडून ते गुपित ऐकून त्या लुटारूने त्याला आणखी बेदम मारले आणि त्याच्या दोन्ही पायांतील बूट काढले व त्यांत लपविलेले दहा हजार रूपये घेऊन तो तेथून निघून गेला. तो वाटमाऱ्या तेथून निघून जाताच तो इसम स्वतःशीच म्हणाला, "खरे पाहिले तर, तो लुटारू आपले खिसे तपासून त्यांत पैसे नाहीत असे बघून आल्या वाटेने जाण्यास निघाला होता. परंतु त्याने आपल्याला जाता जाता 'दरिद्री' व 'मूर्ख' अशा शिव्या दिल्या. आता हे मला कळायला पाहिजे होते की, त्याने तसे म्हटल्याने आपण थोडेच दरिद्री व मूर्ख ठरणार होतो? पण काय करणार, नको तेव्हा आपली जीभ पाघळली व त्यामुळेच आपल्यावर हे संकट ओढवले, म्हणजेच काय तर, 'आधी बुद्धि जाते आणि मग भांडवल जाते' असे म्हणतात तेच खरे आहे.