येशू लाजारास जिवंत करितो

येशू लाजारास जिवंत करितो

bookmark

‌‌‌एके दिवशी, लाजर खूप आजारी असल्याची बातमी येशूला कळली. ‌‌‌लाजर व त्याच्या दोन बहिणी मरीया व मार्था हे येशूचे जवळचे मित्र होते. ‌‌‌जेव्हा येशूने ही बातमी ऐकली तेंव्हा तो म्हणाला, ‘‘हा आजार मरणासाठी नाही, तर हा आजार देवाच्या गौरवासाठी आहे.’’ ‌‌‌येशू आपल्या मित्रांवर प्रीती करत होता, परंतू तो होता त्या ठिकाणी आणखी दोन दिवस राहिला.

‌‌‌दोन दिवसानंतर, येशू आपल्या शिष्यांना म्हणाला,‘‘आपण पुन्हा यहूदीयामध्ये जाऊ’’. ‘‘परंतू गुरुजी ’’ शिष्यांनी उत्तर दिले, ‘‘थोडया वेळापूर्वीच तेथील लोक आपणास मारावयास टपले होते!’’ ‌‌‌येशू म्हणाला, ‘‘आपला मित्र लाजर हा झोपला आहे, मी त्याला उठवणे अगत्याचे आहे.’’

‌‌‌येशूच्या शिष्यांनी उत्तर दिले, ‘‘प्रभुजी, जर लाजर झोपलेला आहे तर तो बरा होईल.’’ ‌‌‌तेंव्हा येशूने त्यांना स्पष्ट शब्दांत सांगितले, ‘‘लाजर मेला आहे. ‌‌‌आणि मी तेथे नव्हतो म्हणून मला आनंद वाटतो, यासाठी की तुम्ही मजवर विश्वास ठेवाल.’’

‌‌‌जेंव्हा येशू लाजर राहत असलेल्या गावी आला, तेंव्हा लाजर मरुन चार दिवस झाले होते. ‌‌‌मार्था येशूला भेटण्यासाठी बाहेर गेली आणि म्हणाली, ‘‘प्रभुजी, जर आपण इथे असता, तर माझा भाऊ मेला नसता. ‌‌‌परंतु माझा विश्वास आहे की आपण जे काही देवाजवळ मागाल, ते देव देईल.

‌‌‌येशू म्हणाला, ‘‘पुनरुत्थान व जीवन मीच आहे. ‌‌‌माझ्यावर विश्वास ठेवणारा मेला असला तरी जगेल. ‌‌‌आणि जो मजवर विश्वास ठेवितो तो कधीही मरणार नाही. ‌‌‌याजवर तू विश्वास ठेवतेस काय?’’ ‌‌‌मार्थाने उत्तर दिले, ‘‘होय,प्रभुजी! ‌‌‌आपण देवाचे पुत्र मशीहा आहात असा मी विश्वास धरिते’’

‌‌‌तेंव्हा मरीया तेथे आली. ‌‌‌ती येशूच्या पाया पडली आणि म्हणाली, ‘‘प्रभुजी, तुम्ही येथे असता, तर माझा भाऊ मेला नसता.’’ ‌‌‌येशूने त्यांना विचारले, ‘‘तुम्ही लाजारला कोठे ठेविले आहे?’’ ‌‌‌त्यांनी म्हटले ,‘‘कबरेमध्ये. ‌‌‌या आणि पाहा.’’ ‌‌‌तेंव्हा येशू रडला.

‌‌‌ती खडकामध्ये खोदलेली कबर होती व तिच्या दाराशी धोंडा ठेवण्यात आला होता. ‌‌‌कबरेपाशी येऊन येशू त्यांना म्हणाला, ‘‘धोंडा बाजूला सारा.’’ ‌‌‌परंतू मार्था म्हणाली, ‘‘त्याला मरुन चार दिवस झाले आहेत. ‌‌‌आता त्याला दुर्गंधी येत असेल.’’

‌‌‌येशूने उत्तर दिले, ‘‘तू विश्वास ठेवशील तर देवाचे गौरव पाहशील असे मी तुला सांगितले नव्हते काय?’’ ‌‌‌मग त्यांनी ती धोंड काढली.

‌‌‌तेव्हा येशूने वर स्वर्गाकडे पाहून म्हटले, ‘‘बापा, तू माझे ऐकले म्हणून मी तुझे आभार मानतो. ‌‌‌मला ठाऊक आहे, की तू सर्वदा माझे ऐकतोस, परंतू जो लोकसमुदाय सभोवती उभा आहे त्यांच्याकरिता मी बोललो, हयासाठी की तू मला पाठविले आहे असा विश्वास ते धरतील.’’ ‌‌‌मग येशूने मोठयाने हाक मारली, ‘‘लाजरा, बाहेर ये!’’

‌‌‌तेंव्हा तो लाजर बाहेर आला! ‌‌‌त्याचे हातपाय प्रेतवस्त्रांनी बांधलेले होते. ‌‌‌येशूने त्यांना सांगितले, ‘‘ प्रेतवस्त्रे काढुन टाकण्यासाठी त्याला मदत करा व त्याला मोकळे करा! ‌‌‌हा चमत्कार पाहून अनेक यहूद्यांनी येशूवर विश्वास ठेविला.

‌‌‌परंतु यहूद्यांचे धार्मिक पुढारी येशूचा द्वेष करु लागले, व येशू आणि लाजर यांना जीवे मारण्यासाठी योजना आखू लागले.

बायबल कथा: ‌‌‌योहान 11: 1 - 46