मगर आणि माकड
नदीच्या किनारी एक आंब्याचे झाड होते. त्या झाडावर एक माकड राहत होते. एके दिवशी एक मगर नदीच्या पाण्यातून बाहेर आला. त्याला शिकार मिळाली नव्हती म्हणूनच मगराला खूप भूक लागली होती. मगर माकडाला म्हणाला. मला खूप भूक लागली आहे. मला काहीतरी खायला दे.
भुकेला मगर पाहून माकडाने त्याला आंब्याची फळे खायायला दिली. रोजच मगर माकडाकडे येउन आंबे मागू लागला. मगर आणि माकडात मैत्री झाली. ते दोघे चांगले मित्र झाले. एके दिवशी मगराने काही आंबे आपल्या बायकोसाठी घरी नेली. ती अत्यंत गोड फळे खाल्ल्यावर मगराची बायको त्याला म्हणाली, ' इतकी गोड फळे खाणाऱ्या माकडाचे हृदय किती गोड असेल नाही का...?'
माकडाचे हृदयच मला खाण्यासाठी आणून द्या. असा हट्ट बायकोने धरल्यामुळे मगराचा निरुपाय झाला. मगर निरुपायास्तव या कामासाठी तयार झाला. दुसऱ्या दिवशी मगर माकडाला म्हणाला., प्रिय मित्र तुला माझ्या बायकोने घरी जेवणासाठी बोलावले आहे. चल आपण घरी जेवायला जाऊ. मगर माकडाला पाठीवर घेऊन घरी जाययल निघाले. मगराला राहवले नाही म्हणून त्याने प्रिय मित्राला सांगितले कि, 'माझ्या प्रिय पत्नीला तुझे हृदय हवे आहे,' म्हणून आपण घरी चाललो आहोत. अत्यंत हुशार असणाऱ्या त्या माकडाने क्षणाचाही विलंब न लावता मगराला सांगितले कि,' अरेरे..! माझे हृदय तर झाडावरच आहे.' मगर म्हणाला 'मग आपण परत झाडाकडे जाऊयात.' दोघेही नदीकिनारी पोहचले. माकड मगराच्या पाठीवरून उतरले आणि झाडावर चढले. सुरक्षित जागी पोहचल्यावर माकड मगराला म्हणाले, 'मित्रा तू विश्वासघातकी आहेस' निघ आता..! मगर खजील झाले. त्याने स्वतःचा चांगला मित्र गमावला होता. तात्पर्य - कोणाचाही विश्वास घात करू नये.
