ज्याची खावी पोळी, त्याची वाजवावी गली
प्रामाणिक बिरबल एकदा अकबर बादशहा आपल्या हातात एक निळ्या रंगाचं वांग धरून बिरबलाला म्हणाला, "हे बघ बिरबल, तसे पाहिले तर वांग हे फळ दिसायला अतिशय घाणेरड आहे, जशी काही एखाद्या भिकाऱ्याची झोळीच आहे असे वाटते. या वांग्याचा देठ म्हणजे जणू काही गळयात अडकवायचा बंद आणि याचा हा देठाखालचा फळाचा भाग म्हणजे आतील भिक्षेच्या वजनाने खाली लोंबणारी झोळीच आहे. आता तू बोल की या फळाबद्दल तुझे मत माझ्यासारखेच आहे ना?" तेव्हा बिरबल अतिशय अदबीने म्हणाला, "हुजूर, आपण किती हुबेहूब वर्णन केलंत या फळांच! या फळाबद्दल मला देखील अगदी तुमच्यासारखच वाटतं. हे फळ दिसण्याच्या बाबतीत बघितले तर या फळासारख भिकार फळ दुसरं नसेल." यानंतर काही दिवसांनी परत तशाच यानंतर काही दिवसांनी परत तशाच प्रकारचं एक वांग घेऊन बादशहा आला व बिरबलाला म्हणाला, "बिरबल, हे बघ, वांग हे फळ दिसायला फारच सुंदर आहे नाही का? देठ वर व फळ खाली, असं हातात धरलं की, जणु राजछत्राखाली, एखादा बाळसेदार बादशहाच बसला असे वाटते. आता तू सांग या फळाबद्दल तुला काय वाटते?" बिरबलाने एका क्षणाचा विलंब न लावता तो बादशहाला म्हणाला, "खाविंद, आपण अगदी माझ्या मनातंल बोललात. मी तर म्हणेन खरोखरच वांग्यासारख देखणं व राजेशाही रूबाबाचं असे दुसरं फळ या पृथ्वीतलावावर शोधले तरी सापडणार नाही." ते ऐकून मात्र बादशहा रागावून बिरबलाला म्हणाला, "बिरबल, तुला तरी कळते का, की तु काय बोलत आहेस. मी चार-पाच दिवसांपूर्वी वांग्याची निंदा केली त्यावेळेस तू देखील त्याची 'भिकार' म्हणून संभावना केलीस, आणि आता मी त्याची स्तुती करू लागलास. तू मी जसे बोलतोस तसेच का बोलतो. तुला तुझे असे स्वतःचे मत आहे की नाही?" त्यावर बिरबल म्हणाला, “खाविंद, मी आपला नोकर आहे; या वांग्याचा नाही. तेव्हा माझे काम म्हणजे आपल्याला राजी ठेवणं, आणि ही सुखाची नोकरी टिकवणं, मग त्या वांग्याची पर्वा करण्याचं मला काय कारण? माझे असे मत आहे की, 'ज्याची खावी पोळी, त्याची वाजवावी टाळी,' आणि या तत्वानुसार जर वागले तर या व्यवहारी जगात माणसाचा निभाव लागतो." बिरबलाचे हे बोलणे ऐकून बादशहा खदखदून हसू लागला.
