गरज सरो, वैद्य मरो

गरज सरो, वैद्य मरो

bookmark

मेहनती श्यामराव एका गावात एक श्यामराव नावाचे अतिशय सज्जन गृहस्थ रहात होते. श्यामरावांना एकच मुलगा होता. त्यामुळे त्यांनी आपला सर्व पैसा आपल्या एकुलत्या एक मुलाच्या शिक्षणासाठी खर्च करून त्याला भरपूर शिकवले आणि आपल्या ओळखीने त्याला चांगली सरकारी नोकरी मिळवून दिली व त्याचे लग्न करून दिले. परंतु त्यामुळे त्यांच्याकडे मात्र काहीही पैसा शिल्लक राहिला नाही व ते कफल्लक बनून आपल्या मुलाकडे राहू लागले. श्यामरावांचा मुलगा घनःश्याम हा श्रीमंताच्य मुलीशी लग्न झाल्याने व त्यातूनच लवकरच कलेक्टरच्या जागी बढती झाल्याने, वडिलांना विसरला आणि बायकोचेच सर्व म्हणणे ऐकू लागला. तो वडिलांचा पाणउतारा करू लागला व तो विसरून गेला की वडिलांनी आपल्यासाठी काय काय केले आहे ते ! एके दिवशी तर त्याने आपल्या बायकोच्या सांगण्याप्रमाणे आपल्या वडिलांना घराबाहेर घालवून दिले. श्यामरावांची दोन वर्षांपूर्वी बायको वारली व आता मुलानेही घराबाहेर हाकलून दिले, म्हणून बिचारे श्यामराव आता पुढे काय करायचे असा विचार करू लागले. परंतु तरी देखील खचून न जाता, त्यांनी एक जालिम उपाय शोधून काढला. त्यांनी आपल्या ओळखीच्या एका मोच्याकडून पादत्राणं दुरूस्त करण्याची हत्यारं, काही फाटक्या चपला व चामडयाचे तुकडे, तसेच मित्राच्या मुलाकडून दुकानाचा फलक, अशा सर्व वस्तु घेतल्या व ते आपल्या मुलाच्या बंगल्याच्या जवळ असलेल्या नाक्यावर गेले आणि त्यांनी तेथे चप्पल दुरूस्तीचे दुकान थाटले. तेथे जवळ असलेल्या विजेच्या दिव्याच्या खांबाला त्यांनी दुकानाची माहिती देणारी ठळक अशी पाटी देखील लावली. रस्त्यावरून येणारा-जाणारा प्रत्येकजण ती पाटी वाचू लागला. ही गोष्ट घनःश्याम व त्याची बायको या दोघांनाही समजली व त्यांचे धाबे दणाणले. घनःश्यामला ते ऐकून खूप राग आला व तो रागाने बायकोला म्हणाला, "तुला माहित आहे काय? माझ्या आई-बाबांनी माझ्यासाठी आपल्या हाडांची काड केली व मला या पदावर पोहोचवले आहे. आज मी ज या मोठ्या पदावर पोहोचलो आहे ते केवळ माझ्या आई-बाबांमुळेच. आई बिचारी गेली व सुटली, परंतु 'गरज सरो व वैद्य मरो,' असे मी माझ्या बाबांशी वागलो आहे, आणि ते फक्त तुझ्या सांगण्यामुळेच. आता मला त्याचे फार वाईट वाटते आहे." तेव्हा घनःश्यामची बायको त्याला म्हणाली, "मी तुला लाख सांगितल असेल. पण त्याप्रमाणे वागायच की नाही, हे ठरविण्यासाठी तुम्हांला डोके दिले आहे ना! मग त्याचा वापर तुम्ही करायला हवा होता! जाऊ द्या. आता मात्र आपली जेवढी शोभा व्हायची ती झाली आहे, आता अधिक व्हायला नको असेल तर आपण आत्ताच त्यांच्याकडे जाऊ व त्यांना मानाने घरी घेऊन येऊ." घनःश्यामला बायकोचे म्हणणे पटले व तो तिच्यासह वडिलांकडे गेला आणि त्यांच्या दुकानातलं सामान मूळ मालक असलेल्या मोच्याकडे रवाना करून त्याने आपल्या वडिलांची मनापासून क्षमा मागितली व त्यांना आदराने घरी घेऊन आला. त्यामुळे श्यामरावांचे उरलेलं आयुष्य आनंदात व सुखात गेले.