कोल्हयाला द्राक्षे आंबट

कोल्हयाला द्राक्षे आंबट

bookmark

धूर्त कोल्हा एका जंगलात एक कोल्हा रहात होता. एकदा त्याला खूप भुक लागली तेव्हा तो आपले भक्ष शोधण्यासाठी भटकत होता. तेव्हा त्याला द्राक्षांचा एक मळा दिसला. त्या मळयातील मंडपांवर चढलेल्या वेलींवर पिकलेल्या त्या द्राक्षांचे घड पाहून त्याच्या तोंडाला खूपच पाणी सुटले. कोल्हयाने प्रथम त्या मळयात कोणीही राखणदार नाही ना ! याची खात्री करून घेतली व मग तो त्या मळयात शिरला आणि एका मंडपाखाली जाऊन, खाली लोंबणारा द्राक्षांचा एक घड वेलीपासून तोडण्यासाठी उडया मारू लागला. ती द्राक्षे मिळविण्यासाठी त्याने खूप धडपड केली परंतु त्याचे सर्व प्रयत्न व्यर्थ गेले. कोल्याला समजले की, ही द्राक्षे मिळविणे आपल्या आवाक्याबाहेरचे आहे, म्हणून आपल्या मनाची समजूत घालण्यासाठी तो स्वतःशीच म्हणाला, "खरे पाहता, ही द्राक्षे अगदीच आंबट आहेत आणि तरी देखील ती मिळविण्यासाठी मी उडया मारण्यात माझा उगाच वेळ वाया घालविला. तेव्हा आता या निरूपयोगी द्राक्षांचा नाद सोडून आपण एखादी चांगली रूचकर शिकार मिळविण्याच्या मागे लागणे हेच ठीक आहे." असे म्हणून तो कोल्हा तेथून निघून गेला. तेव्हापासूनच 'कोल्हयाला द्राक्षे आंबट' ही म्हण प्रचारात आली.